पणतीविक्री-आणि-आत्मनिर्भ
- navadhiti
- May 10, 2023
- 10:41 am
विदयोदय दिवाळी विक्री कौशल्य उपक्रम
भाग 1
श्रावणी, विद्यार्थिनी व छोटी उद्योजिका (कौशल्य उपक्रम) हिचे मनोगत
“ ही जांभळी पणती कितीला दिली? ”
“ साठ रुपयांना !”
दिवसातला शेवटचा पणत्यांचा बॉक्स विकत असताना श्रावणीला (नाव बदललेलं आहे) आपल्या कलाकुसरीचे होत असलेले चीज पाहून आनंद तर झालाच आणि डोळे पाणावले. ज्ञानदीपच्या सगळ्या मैत्रिणी गेले महिनाभर पणत्या, आकाशकंदील रंगवत होत्या. कोरोनाच्या काळामध्ये आईचा हातमागाच्या मिलचा रोजगार थांबला आणि ती जिथे मिळेल तिथे शेत मजूर म्हणून काम करू लागली. वडिलांचा गलालीचा व्यवसाय थांबलाच चार-पाच महिने !
ज्ञानदीपच्या शिक्षण मित्र बाईंच्या सहाय्याने मे महिन्यात शिध्याची मदत मिळाली, नंतर शाळा नाही पण ज्ञानदीपचे activity करत शिकण्याचे सेशन्स सुरू झाले, गावातल्या मित्र-मैत्रिणींशी पुन्हा संपर्कात आले; तेवढाच काय तो प्रकाश. बाकी तर आयुष्यात अंधारच दिसत होता.
जेव्हा विनायकदादाने एक महिन्यापूर्वी या ‘कौशल्य कार्यक्रमा’चा प्रस्ताव आमच्या समोर ठेवला, तेव्हा डोळे आनंदाने लकाकले. या कामामध्ये रंगाबरोबर खेळण्यात मजा होतीच पण त्याचबरोबर जिद्दीने आणि काहीतरी करून दाखवण्यासाठी मिळालेली एक संधी होती. विनायक दादा म्हणाला की, फक्त पणत्या रंगवून थांबायचं नाही, तर त्या विकायच्या ! तेव्हा मनामध्ये थोडीशी भीती होतीच की, आमच्यासारख्या शाळकरी मुलांकडून कोण विकत घेणार पणत्या न आकाशकंदील ?
यामध्ये खूप आव्हाने होती. विद्यार्थ्यांनी, त्यातही शाळेतल्या मुलींनी गावातल्या चौकांमध्ये पणत्या विकणे गावासाठी नवीनच ! त्यातून बरेच लोक नुसते चौकशी करून गेले, मात्र ‘ तुमच्या पणत्या महाग आहेत,’ असं म्हटल्यावर आम्ही पुन्हा दादाकडे गेलो, तेव्हा तो म्हणाला, “ तुम्हीच सुचवा यावर उपाय !” मग आम्ही आमची प्रोडक्शन कॉस्ट कमी करत मार्केटिंग वाढवण्याचा फंडा सुरू केला, ज्यामध्ये सकाळी- संध्याकाळी घरातून चहाचा थर्मास आणून ग्राहकांना चहा देण्याचा उपक्रम केला. आकर्षक रंगात अगदी स्वस्त दरात जास्त व्हरायटीत पणत्या मिळतील, असा कागदी फ्लेक्स बनवून दर्शनी भागात लावला. येणाऱ्या ग्राहकांना ‘No मास्क, No पणती’ असे सांगत, हात निर्जंतुक करवूनच गोष्टी विकल्या. या सगळ्यामुळे खूप विक्री झाली.


‘कृतीतून शिक्षण’ हा ज्ञानदीप प्रकल्पाचा आणि विद्योदयचा श्वास ! या वर्षी प्रथमच ‘कौशल्य विकास उपक्रमा’अंतर्गत विद्यार्थ्यांनी पणती,आकाशकंदील आणि अत्तर निर्मिती व विक्री उपक्रम राबवला.
नव महाराष्ट्र या YouTube चॅनलने ‘विदयोदय’च्या दिवाळी विक्री कौशल्य उपक्रमाची दखल घेतली.
आपण शिरोळ पंचक्रोशीमधील गावचे असल्यास किंवा आपले या भागातील गावात पाव्हणे, नातेवाईक असतील तर जरूर अब्दुललाट मधल्या स्टॉलला भेट द्या, इतरांना भेट द्यायला सांगा आणि मुलांचे मनोबल वाढवा.
पंचक्रोशी बाहेरच्या बाकीच्या सर्व मित्रांना आवाहन आहे की, खालील वेबसाईटवर जाऊन दिवाळीपर्यंत त्याची online ऑर्डर द्या आणि उद्याच्या उद्योजक, ‘आत्मनिर्भर विद्यार्थ्यां’च्या घडणीला प्रोत्साहन द्या.
https://www.bikayi.com/VidyodayActivityTgG
आपले
सावि
विदयोदय मुक्तांगण परिवार
संपर्क – 9420608084
